
रायगड, 20 मे (हिं.स.)। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुळगाव पोलिसांनी राबविलेल्या विशेष नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशनमध्ये मोठी कारवाई करत गावठी कट्टा, तलवार आणि धारदार चाकूंसह तिघांना जेरबंद केले. या धडाकेबाज कारवाईमुळे बदलापूर, वांगणी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
कानोर गाव हद्दीतील बदलापूर-कानूर रोडवरील नागरिक मसाला कंपनीसमोर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली होती. त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम यांना माहिती मिळाली की, दोन संशयित इसम काळ्या-केशरी रंगाच्या बिगर नंबर प्लेट असलेल्या केटीएम ड्यूक मोटारसायकलवरून अग्निशस्त्र आणि घातक हत्यारे घेऊन जाणार आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. काही वेळातच संशयित मोटारसायकल वेगाने येताना दिसताच पोलिसांनी दोघांना अडवून अंगझडती घेतली. यावेळी आरोपी आलोक रामानंद यादव (रा. उल्हासनगर) याच्याकडून काळ्या रंगाचे देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. तर त्याचा साथीदार नितीन युवराज अहिरे याच्याकडून दोन धारदार लोखंडी चाकू हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी दोघांना तात्काळ ताब्यात घेत मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, याच दिवशी गुन्हे प्रकटीकरण शाखेने वांगणी परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवत हिस्ट्रीशीटर अक्षय कवठे याच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना तलवार आणि चाकू आढळून आले. त्याप्रकरणीही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडाकेबाज कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड आणि कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक यशवंत कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोदडे, पोलीस हवालदार बाबू पवार, पोलीस नायक सोमनाथ मोरे, पोलीस शिपाई सचिन जाधव, अविनाश वाकचौरे आणि नरेंद्र कोळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)