“खाकीतील माणुसकी” : १० लाखांचे दागिने प्रामाणिकपणे परत; लातूर पोलिसांचे कौतुक
लातूर, 17 मे (हिं.स.)। समाजात पोलीस दलाविषयी विश्वास अधिक दृढ करणारी एक प्रेरणादायी घटना लातूर शहरात घडली आहे. अण्णासाहेब खोडेवाड यांनी रस्त्यावर सापडलेली तब्बल १० लाख रुपये किमतीची सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅग सुरक्षितपणे मूळ मालकाला प
पोलीसांची माणूसकी


लातूर, 17 मे (हिं.स.)।

समाजात पोलीस दलाविषयी विश्वास अधिक दृढ करणारी एक प्रेरणादायी घटना लातूर शहरात घडली आहे. अण्णासाहेब खोडेवाड यांनी रस्त्यावर सापडलेली तब्बल १० लाख रुपये किमतीची सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी भरलेली बॅग सुरक्षितपणे मूळ मालकाला परत करून “खाकीतील माणुसकी”चे जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड हे मित्रासह खाजगी वाहनाने जात असताना सुशीलादेवी कॉलेजच्या मागील गेट परिसरात रस्त्याच्या कडेला काळ्या रंगाची संशयास्पद बॅग पडलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी तत्काळ वाहन थांबवून बॅगची पाहणी केली.

बॅगमध्ये लहान मुलांचे कपडे, पॅम्पर्स व इतर साहित्य आढळून आले. त्याखाली सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने असल्याचे लक्षात आले. प्राथमिक तपासात सुमारे ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने आणि अंदाजे १ तोळा चांदीचे दागिने मिळून एकूण किंमत जवळपास १० लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले.

इतका मोठा ऐवज सापडूनही सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड यांनी प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शन घडवत बॅग सुरक्षित ताब्यात घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बॅगेच्या मूळ मालकाचा शोध घेण्यात आला. तपासानंतर ही बॅग ज्योती प्रतीक पांचाळ यांची असल्याचे निष्पन्न झाले. आवश्यक पडताळणी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मुद्देमाल त्यांच्या स्वाधीन करण्यात आला.

या घटनेबद्दल अमोल तांबे, मंगेश चव्हाण, समीरसिंह साळवे तसेच संतोष पाटील यांनी खोडेवाड यांच्या प्रामाणिक आणि संवेदनशील कृतीचे कौतुक केले आहे.

“पोलीस म्हणजे केवळ कायदा राखणारी यंत्रणा नसून जनतेचा विश्वास जपणारे संरक्षक आहेत,” हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले असून संपूर्ण लातूर जिल्ह्यात या घटनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande