
बीड, 17 मे (हिं.स.)।
महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा सुरू असलेला प्रकार हा जनतेच्या खिशावर टाकलेला दिवसाढवळ्या दरोडा असून, बीड जिल्ह्यात जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडेल, असा इशारा मनसेचे जिल्हासचिव सोमेश्वर कदम यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कदम म्हणाले, आधीच महागाई, वाढलेली वीज बिले, सततची वीज कपात आणि महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरच्या नावाखाली प्रीपेड वीज योजना लादून सर्वसामान्य जनतेला
आर्थिक गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'रिचार्ज करा आणि वीज वापरा' ही पद्धत म्हणजे जनतेची थेट लूट असून मनसे हा अन्याय कदापि सहन करणार नाही. 'ग्राहकांच्या घरात घुसून जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जशास तसे उत्तर देईल. जनतेच्या संमतीशिवाय एकही स्मार्ट मीटर बसू दिला जाणार नाही. महावितरणने आधी आपला भ्रष्ट आणि निष्क्रिय कारभार सुधारावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनासाठी तयार राहावे,' असा थेट इशाराही कदम यांनी दिला. तसेच नागरिकांनी जागरूक राहून कोणालाही परवानगीशिवाय मीटर बसवू देऊ नये. जर जबरदस्ती होत असेल तर तत्काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis