‘लाडकी बहीण’ लाभार्थींमध्ये संभ्रम; हप्ता न मिळण्यामागे पात्रता निकष कारणीभूत?
पुणे, 17 मे (हिं.स.)। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे एकूण ३००० रुपये जम
‘लाडकी बहीण’ लाभार्थींमध्ये संभ्रम; हप्ता न मिळण्यामागे पात्रता निकष कारणीभूत?


पुणे, 17 मे (हिं.स.)।

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपयांप्रमाणे एकूण ३००० रुपये जमा झाले आहेत. मात्र, काही लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा न झाल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आपला हप्ता बंद झाला आहे का, अशी शंका अनेक महिलांच्या मनात निर्माण होत असली तरी लाभार्थींना आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मार्च महिन्याचा हप्ता काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे रखडला होता. त्यामुळे सरकारकडून मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे वितरित केले जात आहेत. मात्र, काही महिलांच्या खात्यात रक्कम जमा न होण्यामागे विविध कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

या योजनेसाठी सरकारने काही पात्रता निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच एका कुटुंबातील केवळ एका महिलेलाच या योजनेचा लाभ दिला जातो. सरकारी सेवेत कार्यरत सदस्य असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

यामुळे ज्या महिलांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही, त्यांनी अर्जाची स्थिती आणि कागदपत्रांची पूर्तता तपासून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande