लातूर पोलिसांचे ‘ऑलआऊट’ आणि ‘कोंबिंग ऑपरेशन’; ४ जणांवर शस्त्र कायद्यान्वये कारवाई
लातूर, 17 मे (हिं.स.)। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी लातूर पोलीस दलाने दि. १६ ते १७ मे दरम्यान मध्यरात्री जिल्हाभरात विशेष ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबविले. या धडक मोहिम
पोलीस कारवाई


लातूर, 17 मे (हिं.स.)। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी लातूर पोलीस दलाने दि. १६ ते १७ मे दरम्यान मध्यरात्री जिल्हाभरात विशेष ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबविले. या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी कठोर संदेश दिला आहे.

अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत ३३ पोलीस अधिकारी आणि १४५ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या घरांवर अचानक भेटी देत त्यांच्या हालचालींची पडताळणी केली. ते सध्या कुठे वास्तव्यास आहेत, कोणत्या व्यवसायात कार्यरत आहेत तसेच त्यांच्या वर्तनात काही संशयास्पद बदल आहेत का, याची सखोल चौकशी करण्यात आली. विशेषतः मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये सहभागी होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले.

ऑपरेशन दरम्यान ४ जणांविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच संशयास्पद हालचाली करणाऱ्या ५ जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२(क) अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

याशिवाय ३५ सराईत घरफोडे आणि इतर गुन्ह्यांतील आरोपींच्या घरी भेट देऊन त्यांना भविष्यात समाजविघातक कृत्यांपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला. पोलिसांनी जिल्ह्यातील ११७ लॉजेस व हॉटेल्सची तपासणी केली तर ३० संवेदनशील ठिकाणांची पाहणीही करण्यात आली.अशी माहिती आज देण्यात आली आहे

जिल्ह्यात विविध ३३ ठिकाणी नाकाबंदी करून ४२३ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ७ वाहनचालकांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लातूर पोलिसांनी स्पष्ट केले की, कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यातही अशा प्रकारचे ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’ सातत्याने राबवून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande