राज्यातील ३ हजारांहून अधिक धरणांमधील पाणीसाठा घटला
पुणे, 17 मे (हिं.स.)। राज्यातील सर्व विभागांतील ३ हजारांहून अधिक धरणांमध्ये सध्या केवळ ३३.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पावसाळा सुरू होऊन धरणांमध्ये पुरेसा साठा होईपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. यंदा ‘अल निनो
Dam


पुणे, 17 मे (हिं.स.)।

राज्यातील सर्व विभागांतील ३ हजारांहून अधिक धरणांमध्ये सध्या केवळ ३३.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पावसाळा सुरू होऊन धरणांमध्ये पुरेसा साठा होईपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या हंगामातही राज्यातील नागरिकांवर पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

राज्यात जलसंपदा विभागांतर्गत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण हे प्रमुख विभाग येतात. या सर्व विभागांमध्ये मिळून एकूण ३ हजार २८ मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

धरणांतील घटता पाणीसाठा लक्षात घेता प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना पाण्याचा वापर नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत अनावश्यक वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande