
पुणे, 17 मे (हिं.स.)।
पुण्यातील मुंढवा परिसरातील ४० एकर सरकारी जमिनीच्या कथित बेकायदा विक्री प्रकरणात सहआरोपी असलेल्या अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल किसनचंद तेजवानी यांच्याविरोधात यापूर्वी पुणे पोलिसांनी तब्बल १८८६ पानांचे आरोपपत्र सादर केले होते. त्यावेळी सहआरोपी दिग्विजय पाटील यांच्याविरोधातील तपास सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते. तपास पूर्ण झाल्यानंतर आता पोलिसांनी १८० पानांचे पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
मुंढवा येथील संबंधित ४० एकर जमीन भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या मालकीची असल्याचे तपासात समोर आले आहे. या जमिनीच्या मूळ वतनदारांच्या वारसदारांचे कथित कुलमुखत्यार (पॉवर ऑफ ॲटर्नी) म्हणून शीतल तेजवानी यांनी ही जमीन अमेडिया कंपनीला बेकायदा विकल्याचा आरोप आहे.
सुमारे १८०० कोटी रुपये किमतीच्या या जमिनीचा व्यवहार अवघ्या ३०० कोटी रुपयांत करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच या व्यवहाराच्या दस्तनोंदणीदरम्यान कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक शुल्क चुकवून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तपासादरम्यान मिळालेली माहिती, कागदपत्रांची छाननी आणि अन्य पुराव्यांच्या आधारे दिग्विजय पाटील यांचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु