
सोलापूर, 17 मे (हिं.स.)।
मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे उभी राहणारी वाहने आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येची गंभीर दखल घेत मंगळवेढा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान सहा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यापुढे रस्त्यात वाहने उभी केल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
रस्त्यावर लहान-मोठी वाहने अस्ताव्यस्त उभी राहत असल्याने एसटी महामंडळाच्या बससह इतर वाहनांच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. स्थानिक नागरिक आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार संभाजी यादव, पोलिस कॉन्स्टेबल सूरज साळुंखे, सचिन काळेल तसेच ब्रह्मपुरी गावचे पोलिस पाटील प्रशांत पाटील यांनी ही कारवाई केली.
या धडक मोहिमेमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड