
सोलापूर, 17 मे (हिं.स.)।
नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित ‘शक्तिपीठ महामार्गा’वरून राज्यातील राजकारण आणि शेतकरी आंदोलन पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारने महामार्गाच्या रेखांकनात काही बदल करून सुधारित अधिसूचना जारी केली असली, तरी नव्या आराखड्यात अनेक शेतजमिनी बाधित होत असल्याचा आरोप करत माजी खासदार राजू शेटी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील अरण (ता. माढा) येथे सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर रविवार, १७ मे रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नवीन आराखड्यानुसार माढा तालुक्यातील मानेगाव, चव्हाणवाडी, वाकाव, केवड, खैरेवाडी, विठ्ठलवाडी, उपळाई (खुर्द), उपळाई (बुद्रुक), रोपळे, वडाचीवाडी, सोलंकरवाडी, बावी, मोडनिंब, अरण आणि तुळशी या गावांचा महामार्ग प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाची नेमकी आवश्यकता काय, असा सवाल आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला असता माजी खासदार राजू शेट्टी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
“शेती वाचवा, गाव वाचवा” आणि “जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अशा घोषणा देत माढा आणि माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. अरण गावातील ७५ वर्षीय महिला शेतकरी रतन निवृत्ती पाटील यांनी तळपत्या उन्हात रस्त्यावर बसून आंदोलनात सहभाग नोंदविल्याने आंदोलनाला भावनिक स्वरूप प्राप्त झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड