
नांदेड, 17 मे (हिं.स.)।
एका अंध महिलेचे मंगळसूत्र चोरणाऱ्या एका महिलेला
ग्रामीण पोलिसांनी दोन तासात अटक केली असून तिच्या विरोधात १२ तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान पोलिसांनी सदरील घटनेत शंभर टक्के वसूली केली आहे. सिडको संभाजीनगर येथील सागर साईनाथ सोनगुरू व पती दोघे अंध असून ते आपल्या घरासमोर गळ्यातील मंगळसूत्र काढून घरासमोर बसले होते. अज्ञात चोरट्याने सदरील महिलेचे मंगळसूत्र चोरुन नेले. याबाबत सागर साईनाथ सोनगुरू या महिलेने तातडीने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी सदर चोरीचा तपास लावण्याचे आदेश पोलिसांना दिले. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन या प्रकरणातील
अज्ञात चोरांचा गोपनीय माहितीच्या आधारे दोन तासात तपास करुन सिडको येथील महिला हि ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर महिलेने चोरी केल्याची कबुली देत अंध महिलेचे चोरलेले दागिने सदर महिलेने परत केले. ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी घटनेची गंभीर दखल घेत. सदर महिला आरोपीच्या विरोधात १२ तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड यांच्या पथकाने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis