
अमरावती, 17 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यासंदर्भात कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठात सहविचार सभा झाली. देशाच्या विकास कार्यात आपले योगदान देण्यासाठी आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे.विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांचे महिन्यातील सर्व शनिवारचे शैक्षणिक कामकाज ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महिन्याच्या प्रत्येक शनिवारी विद्यापीठात नो व्हेईकल डे पाळण्यात येईल. त्या ठिकाणी परिसरात कोणीही पेट्रोल किंवा डिझेलची वाहने आणणार नाहीत. केवळ सायकल व ई - बाईक आणू शकतील किंवा विद्यापीठात बसने येता येईल. यामधून दिव्यांग कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे.
ऑनलाईन बैठका
ऑनलाईन बैठकांसंदर्भात विद्यापीठाच्या विविध विभागांतर्गत होणार्या सर्व समित्या व उपसमित्यांच्या बैठका प्रत्यक्ष घेण्याऐवजी ऑनलाईन किंवा आभासी पध्दतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
कारपुलिंग व शेअरिंग
कारपुलिंग व शेअरिंग संदर्भात पुढील सहा महिन्यांसाठी एकाच भागातून येणारे सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी वाहनांचे शेअरिंग किंवा कारपुलिंग करण्याचा प्रयत्न करावा, असाही निर्णय या सभेत घेण्यात आला.
याबाबत विद्यापीठाच्या प्रशासन विभागाकडून तातडीने परिपत्रक काढून सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभागांना कळविण्यात येणार असून सर्वांनी त्याचे काटेकोरपणे पालन करावयाचे आहे, अशा सूचना याप्रसंगी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी दिल्यात. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे उपस्थित होते. सहविचार सभेला विद्यापीठातील सर्व संवैधानिक अधिकारी तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख व समन्वयक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी