
परभणी, 17 मे (हिं.स.)। परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पीसीपीएनडीटी जनजागृती व ‘स्त्री जन्माचे स्वागत’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन महापौर सय्यद एकबाल यांच्या हस्ते रविवारी, दि. १७ मे रोजी बी. रघुनाथ सभागृह येथे दीपप्रज्वलन करून संपन्न झाले.
यावेळी आरोग्य सभापती अबोली कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, महिला व बालकल्याण सभापती अश्विनी जाधव, सहायक आयुक्त गजानन जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुधा कांकरीया यांचे स्वागत महापौर सय्यद एकबाल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उपस्थित आरोग्य अधिकारी व मान्यवरांचे स्वागत गजानन जाधव आणि राजकुमार जाधव यांनी केले. कार्यशाळेला राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मुलगा-मुलगी भेदभाव न करता स्त्री जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन केले. मुलींच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत जिंतूर तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण अधिक असल्याचे नमूद केले. समाजाने सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यशाळेत पीसीपीएनडीटी कायदा, स्त्री-पुरुष समानता, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियान तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, सुकन्या समृद्धी योजना तसेच मोफत सायकल योजनेचा समावेश होता. महापौर सय्यद एकबाल यांनी आपल्या मनोगतात शहरातील आशा वर्कर, स्वच्छता कर्मचारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. महिलांचा सर्वच क्षेत्रात वाढता सहभाग उल्लेखनीय असून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य सभापती अबोली कांबळे यांनी महिला बचत गट, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. डॉ. सुधा कांकरीया यांनी पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती देताना गर्भलिंग निदान हा कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगितले. अशा प्रकरणांची माहिती 1800-233-4475 या हेल्पलाईनवर देण्याचे आवाहन करत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व शासनाकडून १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महिला व बालकल्याण सभापती अश्विनी जाधव यांनी महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांमुळे महिला सक्षम होत असल्याचे सांगत स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis