
सोलापूर, 17 मे (हिं.स.)।
ऊपळवाटे-दहिवली मार्गे टेंभुर्णीला जाणारा तसेच निवृत्तीनाथ महाराजांच्या परतीच्या पालखी सोहळ्याचा महत्त्वाचा सार्वजनिक रस्ता एका शेतकऱ्याने बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या प्रकारामुळे केम परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी न लावल्यास केम गाव बंद आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
केम गावठाण हद्दीतून जाणारा हा रस्ता अनेक वर्षांपासून सार्वजनिक वापरासाठी खुला असून या मार्गावरून केम-टेंभुर्णी एसटी सेवा देखील सुरू होती. सध्या सावडी ते वेणेगाव या ७१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे HAM अंतर्गत काम सुरू आहे. हा मार्ग कोंढेज, निंभोरे, ऊपळवाटे, दहिवली मार्गे वेणेगाव-पंढरपूर रस्त्याला जोडण्यात आला आहे.
मात्र, केम येथील एका शेतकऱ्याने गावठाण हद्दीतील रस्त्यावर मोठमोठे दगड टाकून मागील महिनाभरापासून वाहतूक पूर्णपणे बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या प्रकारामुळे केम-टेंभुर्णी एसटी सेवा बंद पडली असून नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
विशेष म्हणजे, आषाढी वारीनंतर निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरकडे परतताना याच मार्गाचा वापर करते. अवघ्या दीड महिन्यावर आलेल्या आषाढी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने पालखी मार्गाबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.
परिसरातील वातावरण बिघडण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रस्ता खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड