सोलापूर - वाहतूक नियमभंग करणाऱ्या ३७ वाहनधारकांवर कारवाई; १८,५०० रुपयांचा दंड
सोलापूर, 17 मे (हिं.स.)। टेंभुर्णी पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहूल आत्राम यांनी प्रभारी अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसाय आणि वाहतूक नियमभंगाविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. शहरात बुलेट मोटारसायकली
सोलापूर - वाहतूक नियमभंग करणाऱ्या ३७ वाहनधारकांवर कारवाई; १८,५०० रुपयांचा दंड


सोलापूर, 17 मे (हिं.स.)।

टेंभुर्णी पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक राहूल आत्राम यांनी प्रभारी अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर अवैध व्यवसाय आणि वाहतूक नियमभंगाविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत. शहरात बुलेट मोटारसायकलींना बसविण्यात आलेल्या कर्णकर्कश आणि बदललेल्या सायलेन्सरमुळे नागरिक त्रस्त झाले होते. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी ३७ बुलेटचे अवैध सायलेन्सर जप्त करून ते रोलरखाली टाकून नष्ट केले.

टेंभुर्णी शहरात अनेक तरुण बुलेट मोटारसायकलींना मोठ्या आवाजाचे बदललेले सायलेन्सर बसवून फटाक्यांसारखा आवाज करत शहरातून फिरत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या वाढत्या

तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांनी तातडीने विशेष कारवाईचे आदेश दिले.

यानंतर अकलूज चौक, करमाळा चौक, कुर्डूवाडी चौक तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी आणि विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी बुलेटसह विविध वाहनांची तपासणी करून त्यांवरील बदललेले सायलेन्सर फिटरच्या मदतीने काढून घेतले.

त्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरात हे अवैध सायलेन्सर रोलरखाली टाकून नष्ट करण्यात आले. या मोहिमेदरम्यान ३७ बुलेट वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande