
रायगड, 17 मे, (हिं.स.) : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने दिलेल्या धडकेत चार वाहनांचा साखळी अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे अडोशी गाव हद्दीत पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील किमी 38/500 मुंबई लेनवर हा अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एमएच 18 सीक्यु 9300 वरील चालक, मूळ रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश, याने बस अतिवेगाने, हयगयीने व धोकादायक पद्धतीने चालवत समोरील आय-10 कार क्रमांक एमएच 02 ईई 9581 ला जोरदार धडक दिली.
या धडकेनंतर आय-10 कार पुढे जाऊन इर्टिगा कार क्रमांक एमएच 12 व्हीसी 2497 वर आदळली. त्यानंतर इर्टिगा कारने पुढील पोलीस इनोव्हा कार क्रमांक एमएच 12 एक्सएच 8616 ला धडक दिली. पुढे इनोव्हा कारही समोरील वॅगनर कार क्रमांक एमएच 04 एलवाय 9310 वर आदळल्याने साखळी अपघात घडला.
या अपघातात आय-10 कारचा चालक, रा. खारघर तसेच इर्टिगा कारमधील प्रवासी, रा. कोपरखैरणे हे जखमी झाले. सुदैवाने दोघांनाही साध्या दुखापती झाल्या आहेत.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 177/2026 नोंद करण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184 तसेच बीएनएस 2023 च्या कलम 125(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अमोल धायगुडे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)