विठ्ठल दर्शनासाठी पैशांची मागणी? पंढरपुरातील ऑडिओ क्लिप व्हायरल
सोलापूर, 17 मे (हिं.स.)। पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक दलाल आणि एका भाविकामधील आर्थिक व्यवहाराची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे
Vithal


सोलापूर, 17 मे (हिं.स.)।

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी पैसे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक दलाल आणि एका भाविकामधील आर्थिक व्यवहाराची ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मंदिर समितीने घेतली असून कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अधिक मास सुरू होत असल्याने पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. अशातच ‘वशिल्याने दर्शन’ घडवून आणण्यासाठी प्रती व्यक्ती २०० रुपये या दराने पाच भाविकांकडून एकूण एक हजार रुपये फोन-पेच्या माध्यमातून घेतल्याचा दावा समोर आला आहे.

दलाल आणि भाविकामधील पैशांच्या व्यवहारासंदर्भातील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंदिर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. फोन-पे व्यवहारासाठी वापरण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिस तपासाचे धागेदोरे शोधण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात कार्यकारी अधिकारी विठ्ठल मंदिर समिती, पंढरपूर राजेंद्र शेळके यांनी सांगितले की, दर्शनासाठी पैसे घेऊन वशिल्याने प्रवेश देण्याच्या आरोपासंदर्भातील ऑडिओ क्लिपची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. तसेच कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन संबंधित व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande