
अमरावती, 17 मे (हिं.स.) | अचलपूर, परतवाडा शहरातील अनेक प्रभागात सध्या तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात जेमतेम २० ते २५ मिनिट नळाला पाणी येत असून काही भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून सकाळ, संध्याकाळ दोन्ही वेळ येणारे नळ आता एक वेळही जेमतेमच येत असल्याने नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त होत आहे.
गत मार्च-एप्रिल महिन्यापासूनच जुळ्या शहराचा पाणी पुरवठा पार विस्कळीत झाला आहे. आता तर गेले आठ दिवसांपासून अनेक प्रभागात नियमित जलपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, काही भागात पाणी येत असले तरी ते केवळ ५ ते १० मिनिटांसाठीच सोडण्यात येत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. दोन वेळ नाही तर एक वेळ तरी पुरेसा पाणी पुरवठा व्हावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे.उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. एवढ्या अल्प वेळात नागरिकांना पिण्याचे पाणी, स्वयंपाक, धुणीभांडी तसेच इतर घरगुती गरजा भागविणे अशक्य होत आहे.
अनेक कुटुंबांना महागड्या दराने खासगी टँकर मागवण्याची वेळ आली असून आर्थिक भारही वाढला आहे. नगर पालिकेकडूनही काही भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. परतवाडा तसेच अचलपूर शहरात स्थानिक नागरिकांनी अनेकदा संबंधित विभाग व नगर प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कर आकारणी वेळेवर केली जाते, मात्र मूलभूत सुविधा देताना प्रशासन उदासीन का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
महिला व ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. पाणी येण्याची वेळ निश्चित नसल्याने पहाटेपासूनच नागरिकांना नळाजवळ थांबावे लागत आहे. मर्यादित वेळेत पाणी भरण्यासाठी महिलांची धावपळ होत असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागत आहेत. स्थानिक रहिवाशांनी इशारा दिला आहे की, येत्या काही दिवसांत नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी