
धर्मशाला, 17 मे (हिं.स.) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा फंलदाज विराट कोहलीने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात आपली १६ वी धाव पूर्ण करताच एक मोठा टप्पा गाठला. कोहलीने आयपीएलच्या १९ व्या हंगामात ५०० हून अधिक धावा पूर्ण केल्या आहेत. चालू हंगामात ५०० धावांचा टप्पा गाठणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी हेनरिक क्लासेन आणि साई सुदर्शन यांनी या हंगामात ही कामगिरी केली आहे.
विराट कोहलीने एकाच आयपीएल हंगामात ५०० हून अधिक धावा करण्याची ही विक्रमी ९ वी वेळ आहे. असे करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने नऊ आयपीएल हंगामांमध्ये ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. याबाबतीत त्याने डेव्हिड वॉर्नर आणि केएल राहुल यांना मागे टाकले आहे, ज्यांनी प्रत्येकी सात वेळा एका हंगामात ५०० हून अधिक धावा केल्या आहेत.
विराट कोहली सलग चौथ्या हंगामात ५०० पेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने २०२३ मध्ये ६३९ धावा, २०२४ मध्ये ७४१ धावा, २०२५ मध्ये ६५७ धावा करून इतिहास रचला होता आणि या हंगामातही त्याने ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
कोहलीने आयपीएलमध्ये नऊ शतके झळकावली असून, अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. या हंगामात त्याने केकेआरविरुद्ध शतक झळकावले. कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा क्रिकेटपटूही बनला आहे. त्याने आतापर्यंत एकूण २८० आयपीएल सामने खेळले आहेत. या बाबतीत त्याने २७९ धावा करणाऱ्या रोहित शर्मा आणि २७८ आयपीएल सामने खेळणाऱ्या एम.एस. धोनी यांना मागे टाकले आहे.
आयपीएलमध्ये एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक धावा
११८९* - विराट कोहली विरुद्ध पीबीकेएस (सरासरी: ३७.१५)
११७४ - विराट कोहली विरुद्ध सीएसके (सरासरी: ३७.८७)
११७२ - विराट कोहली विरुद्ध डीसी (सरासरी: ४८.८३)
११६१ - रोहित शर्मा विरुद्ध केकेआर (सरासरी: ४०.०३)
११३४ - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पीबीकेएस (सरासरी: ४९.३)
११२६ - विराट कोहली विरुद्ध केकेआर (सरासरी: ४५.०४)
आयपीएलमध्ये वयाच्या ३५ वर्षांनंतर ५०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आता कोहलीच्या नावावर आहे. विराटने हा पराक्रम तीन वेळा केला आहे, तर सचिन तेंडुलकर आणि फॅफ डु प्लेसिस यांना प्रत्येकी दोनदा ही कामगिरी करता आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे