दिवा–चिपळूण मेमू संगमेश्वरपर्यंत वाढविण्याची मागणी
रत्नागिरी, 18 मे (हिं.स.) । गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात धावणाऱ्या दिवा चिपळूण मेमू गाडीचा विस्तार करून ती संगमेश्वरपर्यंत वाढवावी, अशी मागणी ''निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप''च्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या संदर
दिवा–चिपळूण मेमू संगमेश्वरपर्यंत वाढविण्याची मागणी


रत्नागिरी, 18 मे (हिं.स.) । गणेशोत्सव आणि इतर सणांच्या काळात धावणाऱ्या दिवा चिपळूण मेमू गाडीचा विस्तार करून ती संगमेश्वरपर्यंत वाढवावी, अशी मागणी 'निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप'च्या वतीने कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भातील एक सविस्तर निवेदन रेल्वे प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले आहे.

हा विस्तार झाल्यास मार्गावरील इतर अनेक स्थानकांना आणि गावांतील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार,

कामथे, सावर्डे, आरवली, कडवई आणि आसपासचा परिसरातील नागरिकांना गाडीचा लाभ घेता येईल. चाकरमान्यांना गावी ये-जा करताना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. आरक्षित तिकिटे न मिळाल्याने अनेकांना अत्यंत कसरतीने आणि त्रासाने प्रवास करावा लागतो. या भागातील असंख्य नागरिक रोजगार, शिक्षण, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबई व उपनगरांमध्ये नियमितपणे ये-जा करत असतात. या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी असल्याने मेमू सेवा सुरू झाल्यास या गाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास रेल्वे ग्रुपने व्यक्त केला आहे.

प्रवाशांच्या हिताचा आणि गरजेचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी 'निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप'चे प्रमुख संदेश जिमन यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande