लग्नसराईची विश्रांती : शेतकऱ्यांनी वळवला खरीपपूर्व तयारी आणि मशागतीच्या कामांकडे मोर्चा
लातूर, 18 मे (हिं.स.)। ग्रामीण भागात सध्या धोंड्याचा अर्थात अधिक मास सुरू झाल्याने लग्नसराईला काही काळासाठी ब्रेक लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विवाहसोहळे, धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक गडबडीत व्यस्त असलेला ग्रामीण भाग आता हळूहळू शेतीकामांक
शेतकरी


लातूर, 18 मे (हिं.स.)।

ग्रामीण भागात सध्या धोंड्याचा अर्थात अधिक मास सुरू झाल्याने लग्नसराईला काही काळासाठी ब्रेक लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विवाहसोहळे, धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक गडबडीत व्यस्त असलेला ग्रामीण भाग आता हळूहळू शेतीकामांकडे वळताना दिसत आहे. खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी वर्गाने पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली असून गावागावात ट्रॅक्टर, नांगरणी आणि वखरणीच्या कामांना वेग आला आहे.

हवामान विभागाने यंदा मृग नक्षत्र वेळेवर महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली असून समाधानकारक पावसाचा अंदाजही वर्तविला आहे. त्यामुळे

शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असले तरी पावसाच्या आगमनापूर्वी शेतीची सर्व पूर्वतयारी पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. सध्या बाजारपेठांमध्ये बी-बियाणे, खतं आणि शेती औजारांच्या खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. अनेक शेतकरी बियाण्यांची निवड, शेतातील बांध दुरुस्ती, मशागत आणि पाणी साठवणुकीच्या कामांकडे लक्ष देत आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, हवामानातील बदल लक्षात घेता शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून वेळेत पेरणीची तयारी करणे आवश्यक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande