
पुणे, 18 मे (हिं.स.)।
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अचूक आणि डिजिटल मागोवा घेण्यासाठी ‘एक राष्ट्र, एक विद्यार्थी ओळख’ ही संकल्पना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत ‘अपार’ आणि ‘ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट’ ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी ‘अपार आयडी’ तयार करणे अनिवार्य करण्यात आले आहे.या संदर्भात राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की प्रत्येक विद्यार्थ्याने अपार आयडी तयार करणे बंधनकारक आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने 12 अंकी अपार आयडी तयार करून तो आधार कार्ड आणि डिजीलॉकरशी लिंक करणे आवश्यक आहे.तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि श्रेयांक सुरक्षित ठेवण्यासाठी डिजीलॉकरवर नोंदणी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहणार असून त्याचा एकत्रित मागोवा घेणे सुलभ होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु