
सोलापूर, 18 मे (हिं.स.) : अक्कलकोट तालुका खरीप 2026 हंगामासाठी पूर्णपणे सज्ज झाला असून यंदा तालुक्यात सुमारे 92 हजार 966 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.ही माहिती तालुका कृषी विकास अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांनी दिली.
गेल्या 50 वर्षांतील तालुक्याची खरीप पेरणीची सरासरी 91 हजार 110 हेक्टर असून, यंदाही पेरणी त्याच आसपास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर्षी तूर पिकाची सर्वाधिक पेरणी अपेक्षित असून उडीद आणि सोयाबीनचा त्याखालोखाल वाटा राहणार आहे. बाजारपेठेतील बदलत्या परिस्थितीमुळे शेतकरी सोयाबीन, टोमॅटो, कांदा, पालेभाज्या, फळभाज्या तसेच फळबागांसारख्या नगदी पिकांकडे मोठ्या प्रमाणावर वळत असल्याचे दिसून येत आहे.
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने खतांचे व्यापक नियोजन पूर्ण केले असून तालुक्यासाठी एकूण 20,857 मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. यात युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आणि कॉम्प्लेक्स खतांचा समावेश आहे.
याशिवाय एमआयडीसी आणि फेडरेशनकडे युरिया व डीएपीचा अतिरिक्त बफर साठाही राखीव ठेवण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांची टंचाई भासू नये यासाठी कृषी विभागाने नियोजनबद्ध तयारी केल्याचे सांगण्यात आले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड