‘ज्ञान भारतम’ मोहिमेतून ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न
रायगड, 18 मे (हिं.स.)। केंद्र सरकारच्या वतीने देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञान भारतम’ (Gyan Bharatam) या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रायगड विभागाने केले आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील दुर्मिळ
nyan


रायगड, 18 मे (हिं.स.)। केंद्र सरकारच्या वतीने देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञान भारतम’ (Gyan Bharatam) या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रायगड विभागाने केले आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील दुर्मिळ हस्तलिखिते, प्राचीन पोथ्या, ताम्रपट तसेच पुरातत्व अभिलेखांचा शोध घेऊन त्यांची अधिकृत नोंदणी आणि दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे.

महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असला तरी इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील हस्तलिखितांची नोंदणी कमी प्रमाणात झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील अनेक धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक सार्वजनिक न्यासांकडे मौल्यवान हस्तलिखिते, ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध असून त्यांचे जतन व संवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक न्यासांचे अध्यक्ष, सचिव, विश्वस्त आणि व्यवस्थापक यांनी त्यांच्या ताब्यातील प्राचीन हस्तलिखिते, पोथ्या, ताम्रपट किंवा पुरातत्व अभिलेखांची नोंदणी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत संबंधित हस्तलिखितांची मालकी न्यासाकडेच कायम राहणार असून केवळ राष्ट्रीय स्तरावर त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे.

हस्तलिखिते आणि पुरातत्व अभिलेखांच्या नोंदणीसाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रायगड विभाग येथे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी :

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रायगड विभाग, रायगड

हेल्पलाईन : ०२१४१-२२२४६२

ईमेल : acc.rg-mh@gov.in

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande