बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे मर्म जाणले होते : अरविंद सावंत
नाशिक, 18 मे (हिं.स.) :“बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक वाक्यात आणि कुंचल्याच्या प्रत्येक फटकाऱ्यात मर्म दडलेले होते. मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी ‘मार्मिक’ सुरू केले आणि आयुष्यभर मर्मभेदी विचारांनी महाराष्ट्राची जड
Balasaheb-understood-the


नाशिक, 18 मे (हिं.स.) :“बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक वाक्यात आणि कुंचल्याच्या प्रत्येक फटकाऱ्यात मर्म दडलेले होते. मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी ‘मार्मिक’ सुरू केले आणि आयुष्यभर मर्मभेदी विचारांनी महाराष्ट्राची जडणघडण केली,” असे प्रतिपादन अरविंद सावंत यांनी सोमवारी येथे केले.

नाशिकमधील 103 वर्षांची परंपरा असलेल्या वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आयोजित स्व. राधाकिसन चांडक स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “मर्मभेदी बाळासाहेब” या विषयावर आपले विचार मांडले.

कार्यक्रमाला खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता गायकवाड तसेच प्रथमेश गीते उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धपुतळ्याचे आणि स्व. राधाकिसन चांडक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अरविंद सावंत म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर जन्म घेऊनही आम्हाला बाळासाहेबांसारखे नेतृत्व लाभले, हे आमचे भाग्य आहे. शिवसेनेची स्थापना ही केवळ राजकारणासाठी नव्हे, तर समाजकारण आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झाली होती. प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली आणि कामगार सेना, विद्यार्थी सेना यांसारख्या उपक्रमांतून मराठी अस्मिता जपली.

यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेशी संबंधित अनेक आठवणींना उजाळा दिला. “गद्दारीची बाळासाहेबांना प्रचंड चीड होती,” असे सांगत त्यांनी नाव न घेता राजकीय टोलेबाजीही केली. “श्रीरामाने हनुमानाला खोके देऊन विकत घेतले नव्हते,” असा टोमणाही त्यांनी लगावला.

दरम्यान, व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात ‘चित्रहार भाग-2’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सरगम सुगम संगीत क्लासेसतर्फे सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जुन्या सदाबहार गीतांनी रसिक नाशिककरांना मंत्रमुग्ध केले. गायिका नमिता राजहंस, ऐश्वर्या गडकरी, नीलम भराडे, निश्मिता प्रभू, किर्ती कोल्हे, हितेंद्र शर्मा आणि अनघा निमगावकर यांनी सादर केलेल्या गीतांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande