
बीड, 18 मे (हिं.स.)। फळांचा राजा असलेल्या आंब्याने बीडच्या बाजारपेठेत जम बसवला आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील मुख्य भाजी मंडईमध्ये केशर, दशहरी, हापूस या राजाशाही वाणांसह बदाम आणि डी गावरान आंब्याची आवक वाढली आहे, त्यामुळे काही दिवसांपासून कडाडलेले आंब्याचे भाव आता बऱ्यापैकी स्थिरावले असून ते सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आले आहेत. रविवारी झालेल्या आठवडी बाजारामध्ये आंबे खरेदीसाठी नागरिकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली.
बीडच्या भाजी मंडईत सध्या विविध प्रकारच्या आंब्यांचे ढीगच्या ढीग पाहायला मिळत असून दर ग्राहकांना आकर्षित करत आहेत. बाजारपेठेतील सद्यस्थितीनुसार, ग्राहकांची पहिली पसंती असलेल्या केशर आंब्याची विक्री व्यापाऱ्यांकडून १२० ते १०० रुपये प्रति किलो दराने केली जात आहे. तर सर्वसामान्यांचा आंबा म्हणून ओळखला जाणारा बदाम आंबा चक्क १०० रुपयांमध्ये दोन किलो या दराने विकला जात आहे. याशिवाय रसाळ आणि गोड अशा दशहरी आंब्याची विक्री १०० ते १२० रुपये प्रति किलो दराने होत आहे.
फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या हापूस आंब्याचीही बाजारपेठेत मोठी मागणी पाहायला मिळत आहे. हापूस आंब्यामध्ये स्थानिक बाजारात दोन ते तीन प्रकारचे वाण उपलब्ध असून, त्यांच्या दर्जानुसार आणि आकारानुसार किमती ठरवल्या जात असल्याचे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण आणि शहरी
भागातील ग्राहकांनी मंडईत तसेच पेठ बीडमधील बाजारात गर्दी केली . आवक भरपूर असल्याने फळांचा दर्जाही उत्तम आहे आणि त्यातच किमती आवाक्यात आल्याने ग्राहकांचा खरेदीकडे मोठा कल राहिला. आगामी काही दिवस ही आवक अशीच टिकून राहील आणि नागरिकांना आणखी काही दिवस आंब्याचा आस्वाद घेता येईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis