
बीड, 18 मे : अंबाजोगाई येथील श्री मुकुंदराज स्वामी संस्थान अंतर्गत श्री मुकुंदराज स्वामी मंदिरात अधिक मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानचे अध्यक्ष महंत किसन महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार असून 15 जूनपर्यंत तुकाराम गाथा पारायण, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी पारायण, भजन आणि कीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहात नामदेव महाराज वाहेगावकर यांचे तुकाराम गाथा पारायण, जगजीवन महाराज आंबाड यांचे एकनाथी भागवत पारायण तसेच केशव महाराज वाघाळकर यांचे ज्ञानेश्वरी पारायण होणार आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच भाविकांसाठी सकाळी चहा-फराळ तसेच दुपारी आणि सायंकाळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सप्ताह काळात पहाटे काकडा, विष्णुसहस्रनाम, पारायण, महिला भजनी मंडळाचे भजन, हरिपाठ तसेच रात्री 7 ते 9 या वेळेत कीर्तन आणि हरिजागराचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात अच्युत महाराज जोशी, दीपक महाराज करपे, महादेव महाराज नरुटे, संग्राम महाराज केंद्रे, विजयानंद महाराज अघाव, लक्ष्मण महाराज मेंगडे, हनुमंत महाराज जगताप, संतोष महाराज सोळंके, विकास महाराज गडदे, श्रीहरी महाराज शिंदे, शिवाजी महाराज मुळे, जगन्नाथ महाराज देशमुख, सुधाकर महाराज शिंदे, महादेव महाराज राऊत, महादेव महाराज बोराडे शास्त्री, बिभीषण महाराज मोरे, श्रीकृष्ण महाराज चव्हाण, नागनाथ महाराज शिंदे, पांडुरंग महाराज कोकाटे, आकाश महाराज पाटील, व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी, भूषण महाराज तळणीकर, डॉ. सुदाम महाराज पाणेगावकर आणि वासुदेवानंद महाराज बैरागी यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.
सोहळ्याची सांगता सोमवार, 15 जून रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महंत किसन महाराज पवार यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद आणि रात्री हनुमान शक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री मुकुंदराज स्वामी भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis