
बीड, 18 मे (हिं.स.)। राज्यभरात वाढलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून, घामाद्वारे आवश्यक क्षारद्रव्येही बाहेर पडत आहेत. सध्या तापमान ४० अंशांच्या पुढे जात असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन रोहनील संजय लोहिया यांनी केले आहे.
उन्हाळ्यात केवळ तहान लागल्यानंतरच पाणी पिण्याची वाट न पाहता नियमितपणे पाणी, ताक, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. तसेच दुपारच्या कडक उन्हात शक्यतो बाहेर पडणे टाळावे. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हीच खरी आरोग्यसंपदा असल्याचे त्यांनी सांगितले. उष्माघातापासून बचावासाठी ताक, लिंबूपाणी आणि ओआरएस हे अत्यंत साधे पण प्रभावी उपाय असून, योग्य वेळी त्यांचा वापर केल्यास गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकते, असा सल्लाही त्यांनी दिला.
श्रमाची कामे करणारे शेतकरी, मजूर, सतत प्रवास करणारे नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. उन्हात फिरताना अतिघाम येणे, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, तोंड कोरडे पडणे, अंगात शक्ती न राहणे ही उष्माघाताची प्रारंभिक लक्षणे असून, अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ ओआरएसचे सेवन करणे उपयुक्त ठरते, असे त्यांनी सांगितले. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, मजूर, प्रवासी आणि उन्हात दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तींनी नेहमी ओआरएस जवळ ठेवावे, असे आवाहन रोहनील संजय लोहिया यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis