
परभणी, 18 मे (हिं.स.) : वांगी रस्त्यावरील अपना नगर परिसरातील मारोती मंदिरातील मूर्ती हटविण्याच्या प्रकरणावरून शुक्रवारी परभणी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली. यानंतर संबंधित मंदिरात मारूतीची मूर्ती पुन्हा विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून बसविण्याचा तसेच त्या चौकात पूर्ववत झेंडा फडकविण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला.
या प्रकरणात दोषी ठरलेल्या दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही सभेत देण्यात आली.
बी. रघुनाथ सभागृहात महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसचिव विकास रत्नपारखी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
सभेदरम्यान अनेक संतप्त सदस्यांनी अपना नगरातील मारूती मंदिरातील मूर्ती हटविण्याच्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर कारवाई करत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप सदस्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
तसेच मंदिर परिसरातील चौकात पूर्वीप्रमाणे झेंडा फडकविण्याची मागणीही सदस्यांनी लावून धरली. महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा आणि उपमहापौर गणेश देशमुख यांनी सदस्यांच्या भावना योग्य असल्याचे सांगत प्रशासनाकडून मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल तसेच झेंडा पूर्ववत लावण्यात येईल, असे स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून दोन अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश देण्यात आल्याचेही सभेत सांगण्यात आले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis