
नाशिक, 18 मे (हिं.स.) : नाशिक महापालिकेची महासभा आता ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे महापौर हिमगौरी आहेर-आडके या राजकीयदृष्ट्या एकट्या पडल्याची चर्चा असून, त्यांनी घेतलेल्या ऑनलाइन महासभेच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे.
महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी यापूर्वी पंतप्रधान Narendra Modi यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाचा संदर्भ देत महासभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल आणि डिझेलची बचत व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे, राज्यातील इतर कोणत्याही महापालिकेने असा निर्णय घेतला नसताना नाशिक महानगरपालिका ही ऑनलाइन महासभा घेणारी एकमेव महापालिका ठरली होती.
मात्र, हा निर्णय घेताना महापौरांनी कोणत्याही गटनेत्यांना किंवा नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याची नाराजी विविध पक्षांमध्ये होती. विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे गटनेते पोरजे यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला होता.
महासभेपूर्वी सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत सर्वच गटनेत्यांनी ऑनलाइन महासभेचे विशेष महत्त्व नसल्याचे सांगत ऑफलाईन पद्धतीनेच सभा घेण्यावर भर दिला. या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अजय बोरस्ते, भाजप गटनेते श्याम बडोदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या गटनेत्या सीमा ठाकरे उपस्थित होते.
गटनेत्यांच्या एकमताच्या भूमिकेमुळे महापौरांच्या निर्णयाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV