
लातूर, 18 मे (हिं.स.)। जिल्हा परिषद लातूर अंतर्गत दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक सुरक्षा विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यातील दोन दिव्यांग-अव्यंग विवाहित जोडप्यांना दोन लाख रुपयांच्या धनादेशांचे वाटप सोमवारी करण्यात आले. जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती उत्तमराव माने यांच्या हस्ते हा धनादेश वितरण कार्यक्रम पार पडला.
राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग-अव्यंग तसेच दिव्यांग-दिव्यांग अशा दोन प्रकारच्या विवाह प्रोत्साहन योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयामार्फत लाभार्थींना आर्थिक सहाय्य देण्यात येते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, उपाध्यक्ष दयानंद सुरवसे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिवाजी ज्ञानोबा माचवे व वैष्णवी गोरोबा शिंदे या जोडप्यांना जुन्या शासन निर्णयानुसार 50 हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच दिनेश जनार्धन जाधव व प्रिती दौलतराव कानवटे या जोडप्यांना नव्या शासन निर्णयानुसार 1 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश समाज कल्याण सभापती उत्तमराव माने यांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमास समाज कल्याण समिती सदस्य महोदय मस्के, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता डॉ. राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक लेखाधिकारी शिवाजी शिरडे तसेच समाज कल्याण व दिव्यांग कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी लातूर जिल्ह्यातील दिव्यांग-अव्यंग तसेच दिव्यांग-दिव्यांग विवाहित लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत करण्यात आले. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis