
नांदेड, 18 मे (हिं.स.)।
जीवनशैली, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून हा आजार 'सायलेंट किलर' म्हणून ओळखला जातो. अनेक वेळा कोणतीही लक्षणे न दिसता शरीराला गंभीर हानी पोहोचत असल्याने वेळोवेळी रक्तदाब तपासणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत लक्ष्मीकांत भोसकर यांनी केले आहे.
सतत १४०/९० एमएमएचजी किंवा त्यापेक्षा जास्त रक्तदाब असल्यास त्याला उच्च रक्तदाब मानले जाते. जास्त मीठाचे सेवन, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, वाढलेले कोलेस्टेरॉल, अपुरी झोप आणि कौटुंबिक इतिहास ही उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे आहेत. अनेक रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी काहींना डोकेदुखी, चक्कर येणे, धडधड वाढणे, थकवा, श्वास लागणे किंवा दृष्टी धूसर होणे असे त्रास जाणवू शकतात. रक्तदाब नियंत्रणात न ठेवल्यास हृदयविकाराचा झटका, मेंदूचा स्ट्रोक, किडनी निकामी होणे, हृदयाची कार्यक्षमता कमी होणे तसेच डोळ्यांवर परिणाम होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे नियमित व्यायाम, संतुलित आहार, मीठाचे कमी सेवन, वजन नियंत्रण, ताणतणाव कमी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉ. भोसकर यांनी सांगितले.
'रक्तदाब मोजा, नियंत्रणात ठेवा आणि हृदय सुरक्षित ठेवा,' असा संदेश देत जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त प्रत्येकाने स्वतःचा आणि कुटुंबातील सदस्यांचा रा रक्तदाब तपासण्याचा संकल्प ए करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis