
नांदेड, 18 मे (हिं.स.) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 31 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते पावडेवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन तसेच मालेगाव रोड उत्तर-पश्चिम वळण रस्ता, पूर्णा-निळा रोड आदी विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दौऱ्याच्या नियोजनासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, विकासकामांची तयारी, नागरिकांच्या सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. याबाबतची माहिती बालाजी कल्याणकर यांनी दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यातील सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडावेत यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. बैठकीस गंगाधर बडूरे, उमेश मुंडे, संदीपसिंघ गाडीवाले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, विविध विकासकामांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांना चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रमाच्या तयारीला वेग आला आहे.
याच पार्श्वभूमीवर बालाजी कल्याणकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह पावडेवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून उद्घाटन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालय विभागाच्या सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत यांनी विविध सुविधांची माहिती दिली.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis