
अमरावती, 18 मे (हिं.स.) तिवसा पंचायत समिती कार्यालयात विजेची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाकडून काटकसरीचे वारंवार आवाहन करण्यात येत असताना पंचायत समितीतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनच त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयातील अनेक कॅबिन व विभागांमध्ये अधिकारी-कर्मचारी उपस्थित नसतानाही कुलर, पंखे तसेच इतर विद्युत उपकरणे सुरू ठेवली जात असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.विशेष म्हणजे कार्यालयातील अनेक कर्मचारी बाहेर कामानिमित्त किंवा इतर कारणाने गेलेले असतानाही त्यांच्या कक्षातील विद्युत उपकरणे तासन्तास सुरूच राहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाच्या निधीतून दर महिन्याला हजारो रुपयांचे वाढीव वीज बिल पंचायत समितीला भरावे लागत असल्याची चर्चा आहे.राज्य सरकारने ऊर्जा बचत व खर्च नियंत्रणासाठी विविध शासकीय कार्यालयांना वीज वापरात संयम बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र तिवसा पंचायत समितीत या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. “सामान्य नागरिकांना वीज बचतीचे धडे देणारे अधिकारी स्वतःच नियम पाळत नसतील तर शासनाच्या काटकसरीच्या धोरणाला काय अर्थ उरतो?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.या प्रकाराची वरिष्ठ प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.काही कर्मचारी जेवण व नाश्त्यासाठी बाहेर गेल्यानंतरही केबिन गरम होऊ नये म्हणून कुलर सतत सुरू ठेवण्यात येतात, असे कार्यालयात येणारे नागरिक सांगतात.---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी