
लातूर, 18 मे (हिं.स.) : “शेतकरी हा देशाचा कणा असून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारीत राहणे आवश्यक आहे. वीज पुरवठा, सिंचन व्यवस्था आणि पीकविमा योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही,” असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर शहरातील पंचायत समिती सभागृहात उदगीर-जळकोट मतदारसंघातील खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील तळेगावकर, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, गटनेते रामचंद्र तिरुके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पंचायत समिती प्रतिनिधी, कृषी अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत खत आणि बियाण्यांचा वेळेवर पुरवठा, कृत्रिम टंचाई रोखणे आणि वाढीव दराने विक्री होऊ न देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच कृषी, महसूल, वीज वितरण, सिंचन, पीकविमा आणि बियाणे पुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
आ. संजय बनसोडे यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना दर्जेदार साहित्य वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीवर चर्चा करण्यात आली. पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच कृषी विभागाने गावागावांत जनजागृती मोहीम राबवून आधुनिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन करावे, असे सूचित करण्यात आले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडल्या असून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन संबंधित विभागांनी दिले. या बैठकीमुळे आगामी खरीप हंगामासाठी प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय निर्माण होऊन सकारात्मक वातावरण तयार झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis