
बीड, 18 मे (हिं.स.) : अंबाजोगाई येथील श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने श्री गजानन विजय ग्रंथाच्या चार दिवसीय सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दि. 26 मे ते 29 मे दरम्यान शहरातील देशपांडे गल्लीतील धाकटे देवघर येथे सकाळी 7 ते 10 या वेळेत पार पडणार आहे.
मंडळाच्या वतीने वै. दत्तात्रय जोशी महाराज नळेगावकर यांच्या आशीर्वादाने गेल्या 13 वर्षांपासून श्री गजानन विजय ग्रंथ पारायण, भक्ती संगीत, कीर्तन आणि पालखी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचा सोहळा प्रमुख आनंद महाराज जोशी नळेगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
सोहळ्याची सुरुवात 26 मे रोजी पहाटे 4 वाजता मंगलध्वनीने होईल. पहाटे 5 वाजता रुद्राभिषेक व आरती करण्यात येणार असून, त्यानंतर सकाळी 7 ते 10 या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण होईल. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी 5 वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी महिला भजनी मंडळ यांचे सांप्रदायिक भजन होणार असून, सायंकाळी 6.30 वाजता श्रीपाद बुवा अभ्यंकर यांचे कीर्तन होईल.
दि. 27 मे रोजी पारायण व आरतीनंतर सायंकाळी 5 वाजता सरोजनी देशपांडे, वैशाली विडेकर आणि मधुरा बाभुळगावकर यांचे भक्ती संगीत सादर होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता प्रभंजन महाराज भगत यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
सोहळ्याची सांगता 29 मे रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी महाराज मुळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. यानंतर पालखी उत्सव, महाआरती, महाप्रसाद तसेच ‘सत्संग श्री गजाननाचा’ कार्यक्रम होईल. दीपोत्सवात ‘श्रीं’ची शेजारती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.
याच दिवशी मंडळाच्या वतीने ‘कै. दत्तात्रय महाराज जोशी स्मृती आध्यात्मिक सेवा पुरस्कार’ रामचंद्र महाराज चिंचोलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis