
नांदेड, 18 मे (हिं.स.) : पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील नामांकित कोचिंग क्लास चालक मोटेगावकर यांची चौकशी सुरू झाल्यानंतर नांदेडमधील सर्व कोचिंग क्लास चालकांचीही कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी केली आहे.
लातूर येथील कोचिंग क्षेत्रातील चर्चित आरसीसी क्लासेस चे संचालक मोटेगावकर यांची चौकशी सुरू असल्याने नांदेडमधील काही कोचिंग क्लास चालकांबाबतही संशय निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिक्षणाचे बाजारपेठेत रूपांतर करणाऱ्या क्लास चालकांची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार आणि कर्मचारी आपल्या पाल्यांनी डॉक्टर किंवा अभियंता व्हावे या अपेक्षेने मोठ्या कष्टाने पैसे खर्च करून नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. मात्र काही क्लास चालक गुणवत्तेपेक्षा जाहिरातबाजीवर भर देत असून पेपर फुटीसारख्या गैरप्रकारांद्वारे निकालांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही डॉ. रॅपनवाड यांनी केला.
गोरगरीब पालकांकडून भरमसाठ शुल्क वसूल करून कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देत काही कोचिंग क्लास चालक पालकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लातूरमध्ये चर्चेत आलेल्या मोटेगावकर यांच्या क्लासेसची शाखा नांदेडमध्येही कार्यरत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती जिल्ह्यात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis