
मुंबई, 18 मे (हिं.स.) - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडत प्रणालीमध्ये आजतागायत ७८,९७६ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ५५,२४४ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून आपला सहभाग निश्चित केला आहे. अधिकाधिक अर्जदारांना सोडत प्रक्रियेत सहभागी होता यावे, यासाठी मंडळाने दि. २८ मे, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर सोडतीतील कन्नमवार नगर-विक्रोळी (पूर्व) प्रकल्पातील १२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका आता केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
मुंबई मंडळाने सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या २,६४० सदनिकांपैकी विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील १२२१ सदनिकांच्या किंमतीत ७.५ टक्के कपात केली आहे. मंडळातर्फे मार्च, २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सोडतीमध्ये संकेत क्रमांक ५३८ व ५३८-अ, अंतर्गत बिल्डींग नं. २ अ, ब पॉकेट- २, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई येथील अनुक्रमे २४० व २४० सदनिकांची विक्री किंमत रु. १,३४,६६,४३४ /- ते रु.१,३६,८८,१४३/- , संकेत क्रमांक – ५३९ व ५३९-अ अंतर्गत बिल्डींग नं. ३ अ, ब, क पॉकेट क्र. २ कन्नमवार नगर, विक्रोळी, येथील अनुक्रमे ३७१ व ३७० सदनिकांची विक्री किंमत रु. १,३४,८१,८२१ /- ते रु. १,३७,०३,७८३/- अशी ७.५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर तसेच या प्रकल्पातील सदनिका धारकांना प्रत्येकी ०१ वाहनतळ (पार्कीग) विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. करिता या संधीचा अधिकाधिक इच्छुक अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडतीच्या माध्यमातून मुंबई मंडळाने संधी उपलब्ध करून दिली आहे. मंडळाने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार दि. २८ मे, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल व दि. २९ मे २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करता येईल. तसेच दि. २९ मे, २०२६ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. त्यानंतर सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी दि. १० जून, २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. १२ जून, २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे-हरकती दाखल करता येतील. दि. १६ जून, २०२६ रोजी दुपारी ०३.०० वाजता सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मंडळातर्फे सदनिकांच्या विक्रीसाठी प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दिनांक, ठिकाण व वेळ नंतर संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे.
. मुंबई मंडळाने दि. ३० मार्च, २०२६ रोजी मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील २६४० सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत जाहीर केली. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) १४५ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) ८५८ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) ७९८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) ८३९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी