बसव भारत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर
लातूर, 18 मे (हिं.स.)। बसवकल्याण क्षेत्र समिती यांच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची घोषणा महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. यावेळी अँड. माधवराव पाटील टाकळीकर यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. बसवकल्याण येथे
उत्सव


लातूर, 18 मे (हिं.स.)। बसवकल्याण क्षेत्र समिती यांच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची घोषणा महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. यावेळी अँड. माधवराव पाटील टाकळीकर यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

बसवकल्याण येथे उभारण्यात आलेल्या जागतिक स्तरावरील नूतन अनुभव मंटपाच्या भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दि. 23 ते 27 डिसेंबर 2027 दरम्यान “बसव भारत उत्सव” या नावाने करण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात एक लाख शहाण्णव हजार शरणांची सामूहिक इष्टलिंग पूजा, विविध बौद्धिक सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विचारवंतांचा सहभाग हे मुख्य आकर्षण राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या उत्सवाच्या प्रचार, प्रसार आणि जनजागृतीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये राज्य कार्यकारिण्या गठित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून लातूर येथे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या बैठकीस राज्यभरातून 100 ते 150 शरण बंधू-भगिनी उपस्थित होते.

केंद्रीय समिती सदस्य डॉ. अमरनाथ सोलपुरे यांनी मार्गदर्शन करताना महात्मा बसवेश्वरांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य हे संपूर्ण जगाला जोडणारे असल्याचे सांगितले. अनुभव मंटप ही जगातील पहिली लोकशाही संसद असून महात्मा बसवेश्वरांनी दलित, उपेक्षित आणि वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले, असे त्यांनी नमूद केले. बसवकल्याणचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करून तो अधिक वृद्धिंगत करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दि. 23 ते 27 डिसेंबर 2027 दरम्यान होणारा “बसव भारत उत्सव” हा जागतिक पातळीवर प्रेरणादायी ठरणार असून विविध देशांतील संत, लोकप्रतिनिधी, चिंतक, लेखक, संशोधक आणि कलावंत या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी किमान पाच लाख लोक उपस्थित राहतील, अशा पद्धतीने सूक्ष्म आणि भव्य नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अँड. माधवराव पाटील टाकळीकर यांनी बसवकल्याण हा भारताचा बहुमूल्य सांस्कृतिक वारसा असल्याचे सांगितले. “कायकवे कैलास”, “दया हाच धर्म”, “देह हेच देवालय”, “दासोह” आणि “इष्टलिंग पूजा” हे बसव तत्त्वज्ञान संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांनी प्रेरित नवसमाज निर्माण करण्याची आज मोठी गरज असल्याचे सांगत महाराष्ट्रातून किमान एक लाख लोक या उत्सवात सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी लवकरच जिल्हानिहाय बैठका घेऊन जिल्हा कार्यकारिण्या तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नूतन अनुभव मंटपाची माहिती देणाऱ्या माहितीपत्रकाचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :

डॉ. अमरनाथ सोलपुरे – केंद्रीय सल्लागार

अँड. माधवराव पाटील टाकळीकर, लातूर – अध्यक्ष

विजयकुमार हत्तुरे, सोलापूर – उपाध्यक्ष

डॉ. शेषराव शेटे, नांदेड – सचिव

प्रा. डॉ. राजेश विभुते, लातूर – सहसचिव

सुनील हेंगणे, लातूर – कार्यवाह

सदस्य :

रामेश्वर लांडगे (छत्रपती संभाजीनगर), शीतल महाजन (नांदेड), डॉ. रेणुका संभाहरे (गेवराई), मनोजकुमार रणदिवे (कोल्हापूर)

सल्लागार :

वीरेंद्र मंगलगे, प्रदीप बुरांडे, अप्पासाहेब पुजारी, डॉ. आनंद कर्णे, उषाताई रोडगे

बैठकीस अहमदपूरचे नगराध्यक्ष स्वप्निल हत्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, इंजि. राजकुमार कत्ते, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, महेश अंबुलगे, बसवेश्वर हेंगणे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande