
अमरावती, 18 मे (हिं.स.)।
धामणगाव रेल्वे तालुक्यात गौणखनिज माफियांचा सुळसुळाट वाढत असून अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यालगत साठवून ठेवलेला कोट्यवधी रुपयांचा मुरूम अवैधरित्या चोरीला गेल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मौजा रामगाव, गंगाजळी आणि जळगाव आर्वी परिसरात कालव्यालगतच्या टेकड्या मशीनच्या सहाय्याने पोखरून मोठमोठे खड्डे करण्यात आले आहेत.अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्याच्या भिंतीलगत मोठ्या प्रमाणात मुरूम साठवून ठेवण्यात आला होता. कालव्याच्या बांधकामादरम्यान निघालेला हा मुरूम भविष्यातील दुरुस्ती, आपत्कालीन परिस्थिती तसेच कालव्याच्या भिंतीच्या संरक्षणासाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून गौणखनिज माफियांनी दिवसाढवळ्या या मुरूमाची चोरी सुरू केल्याचे समोर आले आहे.मोठमोठ्या मशीन आणि ट्रकच्या सहाय्याने सुरू असलेल्या उत्खननामुळे कालव्याच्या सुरक्षिततेवरच प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी कालव्याच्या भिंतीलगत खोल खड्डे आणि तळे तयार झाले असून याच मार्गाने अवैध गौणखनिज वाहतूकही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कोट्यवधींचा मुरूम लंपास होत असताना संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.दरम्यान, या गौणखनिज तस्करीत महसूल विभागातील एका माजी अधिकाऱ्याच्या मुलाचा सहभाग असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. कोतवाल, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या हद्दीत सुरू असलेले हे उत्खनन त्यांच्या निदर्शनास नसणे अशक्य असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.याबाबत तहसीलदार अभय घोरपडे यांनी “अवैध उत्खनन व वाहतूक आढळल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल. अप्पर वर्धा कालव्याच्या मुरूम चोरीप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल,” असे सांगितले. दरम्यान, शेतकरी व नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी