
अमरावती, 18 मे (हिं.स.)अमरावती शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील झेंडा चौक, माळीपुरा परिसरात झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या दोन तासांत छडा लावत अमरावती शहर गुन्हे शाखेने तीन आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.माहितीनुसार, दिनांक १७ मे २०२६ रोजी नियंत्रण कक्षाला माळीपुरा परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृत तरुणाची ओळख तेजस श्रीकृष्ण बिलबिले (रा. माळीपुरा, अमरावती) अशी पटली.गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीदार, तांत्रिक विश्लेषण व तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत कुंड सरजापूर, वडाळी आणि मालटेकडी परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान जुन्या वादातून आरोपींनी तेजस बिलबिले याच्यावर चाकूने छातीत वार करून त्याची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच कार्तिक दिगांबर बोरुडे (रा. माळीपुरा) याच्यावरही प्राणघातक हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश राजू बेलसरे (वय २७), वैभव राजू बेलसरे (वय २५) आणि राजू उत्तमराव बेलसरे (वय ५८, सर्व रा. माळीपुरा, अमरावती) यांचा समावेश आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना खोलापुरी गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, रमेश धुमाळ तसेच सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी