
लातूर, 18 मे (हिं.स.) : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना यांनी बुधवार, 20 मे 2026 रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून, या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील रुग्ण आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने खबरदारीचे आवाहन केले आहे.
लातूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या पत्रानुसार, संघटनेच्या सभासदांनी या संपात सहभागी होऊ नये, अशी विनंती प्रशासनाने 14 मे 2026 रोजी पत्राद्वारे केली होती. मात्र, संभाव्य गैरसोय लक्षात घेता नियमित औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांनी आवश्यक औषधे आगाऊ खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) ब. दा. मरेवाड यांनी केले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, बंदच्या काळात अत्यावश्यक औषधे उपलब्ध न झाल्यास नागरिकांसाठी विशेष संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी सहायक आयुक्त ब. दा. मरेवाड यांच्याशी ८२७५१७५२३२ या क्रमांकावर किंवा औषध निरीक्षक स्वा. क. कुपकर यांच्याशी ८८३०८०१८०६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी या आवाहनाला स्थानिक माध्यमांनी प्रसिद्धी द्यावी, अशी विनंती अन्न व औषध प्रशासनाने जिल्हा माहिती कार्यालयाकडे केली आहे. या संदर्भातील माहिती जिल्हाधिकारी, लातूर तसेच अन्न व औषध प्रशासन, छत्रपती संभाजीनगर येथील सह आयुक्त कार्यालयालाही पाठविण्यात आली आहे.----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis