
पुणे, 18 मे (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये “हरित व आत्मनिर्भर शहर” संकल्पनेअंतर्गत विविध पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचतीचे उपक्रम राबविण्याचा निर्णय महापौर रवि लांडगे यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिलेल्या ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशी वापराच्या संदेशाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांना प्रतिसाद म्हणून ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.महापौरांनी आयुक्तांना पत्राद्वारे सूचना देत महापालिका प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, शाळा, गृहनिर्माण संस्था, उद्योग आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून “हरित, ऊर्जा सक्षम आणि आत्मनिर्भर पिंपरी-चिंचवड” घडविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.
या अभियानांतर्गत “हरित पिंपरी-चिंचवड आठवडा”, “नो पॉवर अवर”, “एक कर्मचारी – एक वृक्ष”, ई-वाहन आणि चार्जिंग स्टेशन प्रोत्साहन, “वर्क फ्रॉम होम / व्हर्च्युअल मीटिंग” धोरण, “स्वदेशी बाजार – आत्मनिर्भर पीसीएमसी”, पेपरलेस प्रशासन, “ऑईल फ्री हेल्दी कॅन्टीन”, “सौर पिंपरी-चिंचवड”, “ग्रीन रेटिंग” स्पर्धा, “सायकल टू वर्क डे”, नैसर्गिक शेती, टेरेस गार्डन आणि “हरित गणेशोत्सव” यांसारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून तो लोकसहभागातून जनआंदोलन बनविण्याचा प्रयत्न आहे. विकासासोबत पर्यावरण संरक्षणातही पिंपरी-चिंचवड शहर राज्यात आदर्श निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु