रायगड जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
रायगड, 18 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि आद्य क्रांतीकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागो
Pandit-Deendayal-Upadhyay-empl


रायगड, 18 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग आणि आद्य क्रांतीकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २१ मे २०२६ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा नागोठणे येथील आद्य क्रांतीकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडणार आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित कंपन्या व आस्थापनांमधील विविध रिक्त पदांसाठी तसेच अॅप्रेंटिसशिपसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, डिप्लोमा इंजिनिअर, पदवी इंजिनिअर तसेच इतर पदवीधर उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असून https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली शैक्षणिक माहिती अद्ययावत करावी. त्यानंतर ‘Pandit Dindayal Upadhyay Job Fair’ या पर्यायातून जिल्हा निवडून उपलब्ध पदांसाठी अर्ज करता येणार आहे.

मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नवउद्योजकांना विविध महामंडळांच्या कर्ज योजनांची माहिती, स्वयंरोजगार मार्गदर्शन तसेच मोफत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांची माहितीही दिली जाणार आहे. त्यामुळे रोजगारासोबतच स्वयंरोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत-जास्त बेरोजगार युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अ. मु. पवार यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande