पाथरी तहसील कार्यालयातील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई
परभणी, 18 मे (हिं.स.) : प्रभावी व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे सक्तीचे करण्यात आले असल्याचे पाथरी तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भारत गंगावणे यांनी स्पष्ट केले आहे. यासं
पाथरी तहसील कार्यालयातील उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई


परभणी, 18 मे (हिं.स.) : प्रभावी व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे सक्तीचे करण्यात आले असल्याचे पाथरी तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भारत गंगावणे यांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, सलग तीन दिवस उशिरा कार्यालयात हजर राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक दिवसाची रजा कपात करण्यात येणार आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही वेळेवर उपस्थित न राहणाऱ्यांची त्या दिवसाची अनुपस्थिती ग्राह्य धरून विनावेतन उपस्थिती नोंदविण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांनी दिला आहे.

पाथरी तहसील कार्यालयातील लेटलतीफ अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करणारी निवेदने प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, ‘ड’ गटातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत, तर ‘क’ गटातील कर्मचाऱ्यांनी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे तालुक्यातील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयातील कामकाजात शिस्त येऊन नागरिकांना अधिक प्रभावी सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande