शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रशासनाची सकारात्मक भूमिका आंदोलन पाच दिवस स्थगित
दिशाभूल झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नाशिक, 18 मे (हिं.स.)। : रिंग रोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी साेमवारी (िद.१८) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला केवळ पाच प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावण
Positive role of administration


दिशाभूल झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नाशिक, 18 मे (हिं.स.)।

: रिंग रोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी साेमवारी (िद.१८) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला केवळ पाच प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावण्याचा आग्रह धरणाऱ्या प्रशासनाने अखेर संयमाची व सकारात्मकतेची भूमिका घेत प्रत्येक गावातील प्रतिनिधींना बैठकीसाठी परवानगी दिली. त्यानंतर जवळपास पन्नास शेतकरी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासोबत नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तब्बल अडीच तास सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील रिंग रोड बाधित प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडत भूसंपादन प्रक्रियेमुळे होणाऱ्या अन्यायाबाबत सविस्तर माहिती दिली व न्यायाची मागणी केली. शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील पाच दिवसांत प्रत्येक गावातील दोन प्रतिनिधींनी प्रशासनासोबत चर्चा करावी, विविध विभागीय भूसंपादन प्रक्रियेतील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मध्यम सुवर्णमार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली.

तोपर्यंत शासनाच्या मालकीच्या जागा वगळता इतर कोणत्याही गावातील खासगी जागेवर रिंग रोडचे काम सुरू केले जाणार नाही तसेच कोणतीही मोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. तसेच मुंगसारे व मातोरी परिसरात झालेल्या मोजणीबाबत शेतकऱ्यांनी अधिकृत हरकती दाखल कराव्यात. त्या हरकतींवर कायदेशीर मार्ग काढत सदर मोजणी रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

तसेच हा मार्ग निश्चित झाल्यानंतर नामदार गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक गावनिहाय रिंग रोडच्या प्रस्तावित मार्गाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या संमतीने अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे पुढील पाच दिवसांसाठी जाहीर करण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय शेतकरी व शेतकरी प्रतिनिधींनी एकमताने घेतला. मात्र, हे आंदोलन पूर्णपणे मागे घेतलेले नसून शासनाकडून कुठल्याही प्रकारची दिशाभूल झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.पुढील पाच दिवसांत गावोगावी जाऊन जनजागृती मोहीम राबवून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.आजच्या बैठकीसाठी करण गायकर, कॉम्रेड शेतकरी नेते राजू देसले, शेतकरी नेते साहेबराव दातीर, नवनाथ शिंदे, ॲड. कैलास खांडबहाले, विनोद नाठे आदी विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande