
परभणी, 18 मे (हिं.स.)कायद्याच्या माध्यमातून गोरक्षण करणे ही काळाची गरज आहे असं मत जिल्हा शासकीय आभियोक्ता ॲड .डी. यू .दराडे यांनी व्यक्त केले
वर्धमान संस्कार धाम मुंबई यांच्या वतीने “ॲडव्होकेट संमेलन : कायदा आणि गोरक्षा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास जिल्ह्यातील नामांकित वकील, गोरक्षक, गोशाळा संचालक तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धमान संस्कार धाम मुंबईचे विश्वस्त श्री राजू भाई शाह हे होते, विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र-गोवा-गुजरात क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद परभणी विभाग मंत्री ॲड. जे. बी. गिरी , ॲड. व्यास , ॲड. निलेश आंधळे, शिवप्रसाद कोरे, ॲड. अशोक मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकात त्यांनी वर्धमान संस्कार धाम मुंबई यांच्या माध्यमातून अनेक गोशाळांना चाऱ्याची मदत, निवारा शेड उभारणी, काऊलिफ्टिंग तसेच गोरक्षक आणि गोशाळांसाठी करण्यात येणाऱ्या प्रेरणादायी कार्यांचा उल्लेख केला. आजचे हे वकील संमेलन म्हणजे वकील, गोशाळा आणि गोरक्षक यांच्यात समन्वय निर्माण करून गोरक्षण अधिक प्रभावी करण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हा सरकारी वकील ॲड. दराडे साहेब यांनी गोरक्षणासाठी कायद्याचे महत्त्व सविस्तर स्पष्ट केले. महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा, पशु क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच गोवंश तस्करी विरोधी कायदेशीर तरतुदींचा योग्य वापर करून गायींचे प्रभावी संरक्षण करता येते, असे त्यांनी सांगितले. गोरक्षकांनी कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करावे तसेच पोलीस प्रशासन आणि शासकीय यंत्रणेशी समन्वय ठेवल्यास अनेक प्रकरणांमध्ये त्वरित मदत मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. गोशाळांना कायदेशीर मार्गदर्शन, न्यायालयीन सहाय्य आणि आवश्यक सहकार्य देण्यासाठी आपण सदैव सोबत राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र-गोवा-गुजरात क्षेत्र गोरक्षा प्रमुख भाऊराव कुदळे यांनी गोरक्षणासोबत गोमातेचे महत्त्व सविस्तर सांगितले. प्राचीन काळात एखाद्या गावाची समृद्धी आणि आर्थिक स्थिती त्या गावातील गायींच्या संख्येवरून मोजली जात असे. ज्या गावात अधिक गोवंश असे, ते गाव समृद्ध आणि संपन्न मानले जात असे. गाय ही केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा पाया आहे, असे त्यांनी सांगितले. गोसेवा आणि गोरक्षणाच्या माध्यमातून समाजात संस्कार, संवेदनशीलता आणि आत्मनिर्भरता निर्माण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय अधिवक्ता परिषदचे ॲड. जे. बी. गिरी साहेब यांनी “कायद्याचे पुस्तक” याचे महत्त्व स्पष्ट करताना प्रत्येक वकिलाने गोरक्षणासंदर्भातील कायद्यांचा अभ्यास करून गरजूंची मदत करावी, असे आवाहन केले. गायींच्या संरक्षणासाठी वेळ देण्याचेही त्यांनी सर्व वकिलांना आवाहन केले.
ॲड. निलेश आंधळे यांनी गोरक्षणाचे धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित केले. गाय ही भारतीय संस्कृतीचे प्रतीक असून तिचे संरक्षण करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचे संरक्षण करणे होय, असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis