
पुणे, 18 मे (हिं.स.)।
विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या प्रवेश शुल्काबाबतची संपूर्ण माहिती महाविद्यालयाच्या दर्शनी भागात, संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तिकेत स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमबाह्य किंवा बेकायदा शुल्क आकारल्यास संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिला आहे.उच्च शिक्षण संचालक
डॉ. शैलेंद्र देवळणकर
यांनी विद्यार्थ्यांच्या शुल्कासंदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश सर्व विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक तसेच विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत.त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव
डॉ. मुनजाजी रासवे यांनी सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात पदवी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना विद्यापीठ आणि शुल्क नियामक प्राधिकरण यांच्या मान्यतेनुसार ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी आणि इतर सर्व शुल्कांची संपूर्ण माहिती महाविद्यालयाच्या सूचना फलकावर स्पष्टपणे प्रदर्शित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.हीच माहिती महाविद्यालयाच्या अधिकृत माहिती पुस्तिकेत समाविष्ट करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क आकारल्याचे आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित महाविद्यालयांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु