
आरएमसी असोसिएशनसोबत बैठकीनंतर नवे वाहतूक नियम लागू
पुणे, 18 मे (हिं.स.) : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) मिक्सर वाहनांच्या वाहतुकीसंदर्भातील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
या नव्या निर्णयानुसार बुधवार, शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी सकाळच्या गर्दीच्या वेळेत आरएमसी मिक्सर वाहनांना अंशतः शिथिलता देण्यात आली आहे. हा निर्णय सुरुवातीला एका महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू राहणार असून, त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
हा आदेश वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हेमंत जाधव यांनी आरएमसी असोसिएशनसोबत झालेल्या संयुक्त बैठकीनंतर जारी केला आहे.
वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, हा नियम केवळ आरएमसी मिक्सर वाहनांनाच लागू असेल. हायवा, डंपर, ट्रक आणि इतर जड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंधांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या वाहनांना पूर्वीप्रमाणेच नियमांचे पालन करावे लागणार आहे.
नव्या नियमानुसार, सकाळच्या ‘पीक अवर्स’मध्ये शिथिलता देण्यात येईल, मात्र सायंकाळच्या गर्दीच्या वेळेतील निर्बंध पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.
या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु