
पुणे, 18 मे (हिं.स.)। दुर्गराज रायगड किल्ला हा केवळ ऐतिहासिक गड नसून स्वराज्याची अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याचे प्रतिपादन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ‘माझा गड, माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक शिवभक्ताने रायगड स्वच्छ, प्लास्टिकमुक्त आणि शिस्तबद्ध ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. दि. ५ आणि ६ जून रोजी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे पुण्यात आयोजित राज्यस्तरीय नियोजन बैठकीत ते बोलत होते. ऑल इंडिया छत्रपती शिवाजी मेमोरिअल ट्रस्ट येथे ही बैठक पार पडली.
सोहळ्याच्या तयारीबाबत माहिती देताना संभाजीराजे छत्रपती यांनी यंदाच्या उत्सवाची प्रमुख संकल्पना “प्लास्टिकमुक्त रायगड” असल्याचे स्पष्ट केले. रायगडावर प्लास्टिकच्या बाटल्या तसेच कचरा नेणे टाळावे, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा आणि गडाचे पावित्र्य जपावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवभक्तांना केले. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा लौकिक आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून हा लोकोत्सव अधिक भव्य आणि शिस्तबद्ध करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत येत्या आठवड्यात रायगडावर प्रकाश आणि ध्वनी कार्यक्रम सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे प्रभावी दर्शन घडवणारा हा उपक्रम शिवभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी चाळीस समित्यांच्या माध्यमातून शिवभक्तांसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांचा आढावा घेतला. वाहनतळ, पिण्याचे पाणी, अन्नछत्र, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियंत्रण, शौचालये आणि नियंत्रण कक्ष यांसह विविध सेवांचे व्यापक नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस युवराज शहाजीराजे यांचीही उपस्थिती होती.
देशभरातून लाखो शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर दाखल होणार असल्याने व्यापक नियोजन करण्यात येत असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. या बैठकीला कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, संजय पवार, सचिव अमर पाटील, उपाध्यक्ष चैत्राली कारेकर, प्रशांत दरेकर, अतुल चव्हाण, केतन पुरी, पोलीस उपअधीक्षक शंकर काळे यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी आणि राज्यभरातील समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule