
रायगड, 18 मे (हिं.स.)सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या अधिपत्याखाली जावळी, ता. माणगाव येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी कार्यरत असलेल्या शासकीय निवासी शाळेत सहाय्यक शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर सहा महिन्यांसाठी अथवा नियमित शिक्षक रुजू होईपर्यंत केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेत प्राथमिक स्तरासाठी दोन जागा उपलब्ध असून उमेदवारांकडे एच.एस.सी. व डी.एड. पात्रता आवश्यक आहे. तसेच माध्यमिक स्तरावरील हिंदी विषयासाठी एका जागेसाठी बी.ए. व बी.एड. पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
नियुक्त उमेदवारांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजूर केलेल्या दरानुसार घड्याळी तासांप्रमाणे मानधन दिले जाणार आहे. याशिवाय कोणतेही अतिरिक्त भत्ते देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत अध्यापनाचा अनुभव तसेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता ही किमान अर्हता असून केवळ पात्रता धारण केल्यामुळे मुलाखतीसाठी बोलावले जाईलच असे नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या सेवा प्रवेश नियमांनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पदसंख्या कमी-जास्त करणे अथवा भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचे अधिकार प्रशासनाने राखून ठेवले आहेत.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे व आवश्यक प्रमाणपत्रांसह अर्ज शासकीय निवासी शाळा, जावळी, ता. माणगाव येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुनील जाधव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)